मोदीजी, पडलेल्या 5 लढाऊ विमानांचे सत्य काय ते सांगा! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधी यांचा हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात पाच विमाने पडल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत, ‘मोदीजी, पडलेल्या पाच विमानांचे सत्य काय ते सांगा!’, असा जोरदार हल्ला केला. त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा व्हिडीओच ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत डोनाल्ड ट्रम्प वारंवार वक्तव्ये करीत असून हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्ष आपणच थांबवल्याचा दावाही याआधी केला आहे. आज त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना नवा दावा केला. मे महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेला संघर्ष शस्त्रविरामानंतर शांत झाला; पण झालेल्या संघर्षात पाच लढाऊ विमाने पडल्याचा दावा ट्रम्प यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पडलेल्या पाच विमानांबद्दल सत्य काय आहे हे देशाला जाणून घ्यायचा अधिकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

पडलेली विमाने नक्की कुणाची?

हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षात पडलेली विमाने नक्की कुणाची हे मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेले नाही. संघर्षात विमानांवर हवेतून हल्ला करण्यात आला. यामध्ये ही पाच विमाने पडली गेली, असे ते म्हणाले. त्यामुळे मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.