राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून साधला संवाद, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

ईडीच्या छापेमारीनंतर मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील परमार दाम्पत्याने आत्महत्या करत जीवन संपवले. परमार दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून संवाद साधत त्यांचे सांत्वन केले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांच्या फोनवरून राहुल गांधींनी परमार यांच्या मुलांशी संवाद साधला. यावेळी मुलांचे सांत्वन करत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आणि त्यांना भेटायला येण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.

परमार दाम्पत्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी ईडी आणि भाजप नेत्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधी यांना मुलांना एकटे सोडू नका असे आवाहन केले आहे.

परमार दाम्पत्य काँग्रेस पक्षाचे समर्थक होते. ईडीने त्यांच्या राजकीय सहभागामुळेच त्यांना त्रास दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. गांधींच्या ‘भारत जोडो (न्याय) यात्रेत’ परमार जोडप्याच्या मुलांनी राहुल गांधी यांना त्यांच्या पिग्गी बँक्स दिल्या होत्या.

सुसाईड नोटमध्ये राहुल गांधींच्या उल्लेखाबाबत विचारले असता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी ‘काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. म्हणूनच मी काल तिथे गेलो होतो’, असे सांगतिले.

परमार दाम्पत्याचा मृत्यू हा आत्महत्या नसून राज्य पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप जितू पटवारी यांनी केला आहे. ईडीचा वापर नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे, जेणेकरून ते भाजपमध्ये सहभागी होतील. ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून छळ झाल्याने अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.