कामगारांनो एक व्हा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आवाहन

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज जवाहर भवन येथे झालेल्या राष्ट्रीय मनरेगा कामगार परिषदेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्याविरोधात देशभरातील कामगारांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. आपण एकत्र आलो तर सरकार माघार घेईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर संविधान आणि लोकशाही संपवण्याचा आरोप करत, देशाला स्वातंत्र्यपूर्व काळाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. एकाच व्यक्तीच्या हाती सर्व सत्ता केंद्रित करण्याचा राजेशाही विचार भाजप पुढे रेटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले की, भाजपला जनतेची एकजूट भीतीदायक वाटते. मनरेगा योजनेचे नाव काय असावे, योजना कशी राबवायची आणि किती काळ चालवायची, हे सर्व निर्णय जनता घेऊ शकते. मात्र, समाजात एकतेचा अभाव ही मोठी कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सर्वजण एकत्र आलो, तर पंतप्रधान मोदी माघार घेतील आणि मनरेगा योजना पुन्हा सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांचा दाखला देत राहुल गांधी म्हणाले की, जनतेच्या एकत्रित दबावामुळे सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. त्याच पद्धतीने आता कामगारांवरही अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नव्या कायद्याअंतर्गत काम आणि निधी वाटपाचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असतील आणि भाजपशासित राज्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाजपला संपत्ती काही मोजक्याच लोकांच्या हाती केंद्रित ठेवायची असून गरीबांनी मोठ्या उद्योगसमूहांवर अवलंबून राहावे, हाच त्यांचा देशाचा विकास नमुना असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.