व्होट चोर… गद्दी छोड! रामलीला मैदानावर घुमला आवाज; चोरी भाजपच्या डीएनएमध्येच! सत्याच्या मार्गाने मोदी-शहांना हरवणार : राहुल गांधी

‘जमिनीची चोरी, संस्थांची चोरी, अधिकाराची चोरी, रोजगाराची चोरी, लोकमताची चोरी, सरकार चोरी… ही चोरीच भाजपच्या सत्तेची शिडी आहे. असत्य आणि चोरी ही भाजपच्या डीएनएमध्येच आहे. मात्र, या देशात अंतिम विजय सत्याचाच होतो. त्याच मार्गाने आम्ही मोदी-शहांना हरवणार,’ असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर केला.

नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित ‘व्होट चोर गद्दी छोड’ सभेत बोलताना राहुल यांनी भाजप, आरएसएस व मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

तिन्ही निवडणूक आयुक्तांवर कारवाई करणार

‘ही लढाई सत्यविरुद्ध असत्याची आहे. या लढाईत ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे तिन्ही निवडणूक आयुक्त भाजपसाठी काम करत आहेत. बिहार निवडणुकीत भाजपने लोकांना 10 हजार रुपये वाटले, पण आयोगाने काहीही कारवाई केली नाही,’ याची आठवण राहुल यांनी करून दिली. निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण देणारा नवा कायदा मोदींनी आणला आहे. आमची सत्ता आल्यानंतर हा कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द करून निवडणूक आयुक्तांविरुद्ध कारवाई करणार, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

तेव्हा मोदी-शहा जन्मालाही आले नव्हते! – खरगे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावेळी भाजपवर तोफ डागली. ‘भाजप, आरएसएस हे संविधान संपवत आहेत. देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिले तेव्हा मोदी-शहा जन्मालाही आले नव्हते,’ अशी खोचक टीका खरगे यांनी केली.

नरेंद्र मोदींचा चेहरा बघा. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. काही दिवसांतच देशाला त्यांचे सत्य समजणार आहे. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच अमित शहा शूर आहेत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी यांचे शौर्य गायब होईल. त्यामुळे अमित शहा आणि मोदींना जितकी भाषणे द्यायची तितकी देऊ द्या. काहीही होणार नाही. – राहुल गांधी