Maha Kumbh Mela 2025 – भाविकांवर लक्ष देण्याऐवजी व्हिआयपींच्या दिमतीला, चेंगराचेंगरीला प्रशासनच जबाबदार; राहुल गांधींची सडकून टीका

उत्तर प्रदेशात प्रागराजमधील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झाले आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

प्रयागराजमधील घटना अत्यंत दुःखद आहे. पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. आणि जखमींची प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे राहुल गांधी म्हणाले. या दुःखद घटनेला सदोष व्यवस्थापन, अव्यवस्था आणि सामान्य भाविकांऐवजी व्हिआयपींच्या दिमतीला असलेला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महाकुंभ अजून बरेच दिवस चालणार आहे. आणखी अनेक महास्नान होणार आहेत. यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने व्यवस्थेत सुधारणा करायला हवी. व्हिआयपी कल्चरला लगाम घालावी आणि सामान्य भाविकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी उत्तम व्यवस्था करावी, असा सल्ला राहुल गांधी दिला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी पीडित कुटुंबांची मदद करावी, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी दिली आहे.

‘अपुरी व्यवस्था, व्हिआयपींची गर्दी, स्वतःच्या प्रचारावर भर दिल्याने चेंगराचेंगरी’

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. खरगे यांनी ट्विट करून केंद्र सरकारसह उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत होऊन अनेक भाविकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. अपूर्ण व्यवस्था, व्हिआयपींची गर्दी, अव्यवस्था आणि स्वतःचा प्रचार करण्यात व्यग्र असल्याने चेंगराचेंगरी घडली. हजारो कोटी रुपये खर्चून अशी सुमार व्यवस्था केली, हे निषेधार्ह आहे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.