राहुल गांधी म्हणाले, मणिपूरमधील स्थिती सुधारेल असे वाटत नाही

rahul-gandhi-manipur

गेल्या 9 महिन्यांपासून मणिपूरमध्ये रक्तरंजित हिंसाचार सुरु आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी अजूनही मौन बाळगले असून एकदाही तेथील हिंसाचारग्रस्तांची भेट घेतलेली नाही. यावरून आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी एनडीए सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. मणिपूरमधील स्थिती सुधारेल असे मला वाटत नाही, ग्राऊंडलेव्हलवर तर कोणतीही सुधारणा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा येथे भेट देऊन येथील लोकांशी बोलावे असा उपरोधिक सल्लाही राहुल गांधी यांनी दिला.

राहुल गांधी आजपासून आसाम- मणिपूर दौऱयावर असून त्यांनी आज तेथील लोकांशी चर्चा केली, त्यांचे दु:ख जाणून घेतले. तसेच राज्यपाल अनुसुइया उइके यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर पक्ष कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेऊन मणिपूरमधील सद्यस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

पंतप्रधानांना हात जोडून विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी एक ते दोन दिवसांचा वेळ काढून मणिपूरला यावे. इथे जे काही होत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी करावा. संपुर्ण देश आणि मणिपूरमधील लोकांनाही पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये जाऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात असे वाटते असेही राहुल गांधी यांनी नमुद केले.

हिंसा, द्वेषाने मार्ग निघणार नाही

मणिपूरमधील मदत शिबीरांमधील लोकांना भेटलो. हिंसाचारग्रस्त लोकांशी चर्चा केली आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे सांगत त्यांना धीरही दिला असे राहुल गांधी म्हणाले. हिंसाचार आणि द्वेषाने मणिपूरमधील स्थितीप्रकरणी कोणताही मार्ग निघणार नाही. मी याठिकाणी राजकीय गोष्टी करायला आलेलो नाही. मी राज्यपालांशीही चर्चा केली, काँग्रेस जे काही करू शकते त्याबद्दलचे पत्रही मी त्यांना दिले, असेही त्यांनी सांगितले.