एपस्टीनचे नाव घेताच संसदेत मला बोलण्यापासून रोखले, मंत्री हरदीप पुरी आधीच Compromised आहेत – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात आयोजित संविधान संमेलनात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड केली असून, आपण तेल कोणाकडून घ्यायचे हे आता अमेरिका ठरवत आहे,” असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी संसदेतील एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले, “मी जेव्हा संसदेत एपस्टीनचे नाव घेतले, तेव्हा लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यापासून रोखले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे आधीपासूनच Compromised आहेत. त्यांचे नाव एपस्टीन फाईल्समध्ये आहे आणि ते एपस्टीनचे मित्र राहिले आहेत.”

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या व्यवसायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हरदीप पुरी यांच्या मुलीच्या कंपनीत जॉर्ज सोरोस यांनी पैसे गुंतवले आहेत. मी जेव्हा संसदेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा एकदा अध्यक्षांनी मला अडवले,” असे गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दुहेरी संकटात सापडले असल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, सरकार एका बाजूला एपस्टीन फाईल्स आणि दुसऱ्या बाजूला अदानी प्रकरणामुळे पूर्णपणे घेरले गेले आहे. या प्रकरणांमुळे देशाच्या धोरणांवर बाह्य शक्तींचा प्रभाव पडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.