
महाराष्ट्रातील धुळे एक्स्प्रेसमध्ये गोमांसाच्या संशयाने 72 वर्षाच्या वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणावर राजकारण तापले आहे. दरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्या वृद्ध इसमाचा फोटो शेअर करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपवर द्वेष आणि हिंसा पसरवत असल्याचा हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाला राजकारणात शस्त्र बनवून सत्तेची पायरी चढणारे देशात सातत्याने भितीचे वातावरण पसरवत आहेत. गर्दीच्या स्वरुपात लपलेले द्वेष करणारे घटक उघडपणे हिंसाचार पसरवत आहेत, कायद्याच्या राज्याला आव्हान देत आहेत. या बदमाशांना भाजप सरकारकडून मोकळीक मिळालेली आहे, त्यामुळेच ते अल्पसंख्याकांवर, विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले करत आहेत आणि सरकारी यंत्रणा मूक गिळून गप्प बसली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, अशा अराजक तत्वांविरोधात कठोर कारवाई करुन कायद्याचे पालन कायम केले पाहिजे. हिंदुस्थानची सांप्रदायिक एकता आणि हिंदुस्थानियांच्या अधिकाऱांवर होणारा कोणताही हल्ला हा संविधानातील हल्ला आहे. जो सहन केला जाणार नाही. भाजप कितीही प्रयत्न करुदे, द्वेषाविरोधात हिंदुस्थानला एकत्र आणण्याची ऐतिहासिक लढाई आम्ही जिंकू अशा निर्धार यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
काय आहे प्रकरण?
धुळे एक्सप्रेसमध्ये गोमांस घेऊन चालल्याच्या संशयावरून एका वृद्ध प्रवाशाला सहप्रवाशांनी मारहाण केल्याची घटना कल्याणजवळ घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱया प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगावमध्ये राहणारे अश्रफ अली सय्यद हुसेन (72) त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी कल्याणला निघाले होते. ते धुळे एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांचा सहप्रवाशांसोबत सीटवरून वाद झाला. अश्रफ अली यांच्याकडे बरणी होती. या बरणीत मांस दिसत होते. त्यावरून सहप्रवाशांनी हुसेन यांना जाब विचारला. मांस कसले आहे? कशाचे आहे? अशा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला. त्यानंतर हुसेन यांना शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आली. त्यांनी बरणी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती तुझ्या मांडीवर ठेव अशी धमकीही मारहाण करणाऱया प्रवाशांनी दिली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अश्रफ अली सय्यद हुसेन यांना शोधून काढले आणि मारहाण करणाऱया सहप्रवाशांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.