आरएसएस-भाजपविरोधात लढतो म्हणून माझ्यावर 38 गुन्हे, मी झुकलो नाही, विजयन बाहुले झालेत! राहुल गांधी यांचा उजव्यांसह डाव्यांवरही हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आरएसएस आणि भाजपविरोधात लढतो म्हणून माझ्याविरोधात 38 गुन्हे दाखल केले. सरकारी घर काढून घेण्यात आले. लोकसभेचे सदस्यत्व काढून घेण्यात आले, पण मी झुकलो नाही. स्वतःला डावे म्हणवणारे पिनराई विजयन मात्र उजव्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत,’ अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भाजप व माकपवर हल्ला चढवला.

केरळच्या एर्नाकुलम येथे घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजप व मोदी सरकारसह डाव्या आघाडीवरही जोरदार आसुड ओढले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यावर आणि काँग्रेस पक्षावर रोजच्या रोज टीका करतात. पण ते केरळच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाहीत. कारण भाजप-आरएसएस आणि डाव्या आघाडीची मिलिभगत आहे. पिनराई विजयन हे उजव्या विचारसरणीच्या हातचे बाहुले झाले आहेत. देशात द्वेष पसरवणाऱ्यांसोबत त्यांची भागीदारी आहे. विजयन यांनी त्यांचा पक्ष, कार्यकर्ते आणि केरळच्या जनतेचा विश्वासघात केला आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

केरळच्या मूर्तीचोरीवर मोदी का बोलले नाहीत?

राहुल गांधी यांनी मोदींच्या दुटप्पीपणावरही टीका केली. ‘नरेंद्र मोदी हे त्यांच्या प्रत्येक भाषणात देव, धर्म आणि देवळांवर बोलतात. कुणी देवांचा आणि धर्माचा कसा अपमान केला हे सांगतात. हेच मोदी केरळमधील एका मोठय़ा मंदिरात झालेल्या सोन्याच्या चोरीवर चकार शब्दही का बोलत नाहीत,’ असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

विजयन हे मोदींच्या आणि मोदी हे ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये

हिंदुस्थान-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘अमेरिकेशी कराराच्या बदल्यात हिंदुस्थानला काहीही मिळालेले नाही. कारण नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहेत,’ असा दावा राहुल यांनी केला. त्याचबरोबर, केरळचे मुख्यमंत्री विजयन हे मोदींच्या कंट्रोलमध्ये आहेत, असे राहुल म्हणाले.