पंतप्रधान मोदींना किंकाळ्या ऐकू येत नाहीत; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनी राहुल गांधी संतप्त

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत सोशल मीडियातून आपला संताप व्यक्त केला आहे.

अभिनंदन आणि शुभेच्छांमध्ये व्यग्र असलेल्या नरेंद्र मोदी यांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृण हत्या झालेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबियांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. ज्म्मू-काश्मरीमध्ये रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले. पंतप्रधान अजूनही जल्लोषात मग्न आहेत. देशाला उत्तर हवे आहे. दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्यांना भाजप सरकारमध्ये का पकडले जात नाही? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल

वाढते दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधान मोदींच्या मौनावर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे. पाकिस्तानी नेत्यांच्या शुभेच्छांना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून भरपूर प्रतिक्रिया दिल्या. पण निर्घृण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकार खोटी छाती बडवत आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची हानी होत आहे. दुसरीकडे निष्पाप नागरीक दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहेत. तरीही सर्वकाही पहिल्या सारखेच सुरू आहे, अशी सडकून टीका काँग्रेसने केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा पूर आला आहे. तर पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानी नेते नवाज शरीफ आणि पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यात व्यग्र आहेत. निर्घृण दहशतवादी हल्ल्यांवर ते एक शब्दही बोलले नाही, का? या हल्ल्यांबाबत ते गप्प का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.