पाकिस्तानच्या हल्ल्यात आई वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांना राहुल गांधी यांनी घेतले दत्तक, शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जम्मू कश्मीरमधील ज्या मुलांनी आपले आई वडिल गमावले अशा 22 मुलांना काँग्रेस नेते राहुल गांधी दत्तक घेणार आहेत. पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरून माता पितांचे छत्र हरपले होते. राहुल गांधी यांनी या मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबादारी स्विकारली आहे. राहुल गांधींनी पुरवलेल्या निधीतून त्यांना पदवीपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती जम्मू आणि काश्मीर काँग्रेस प्रदेशाध्य तारीक हमीद कर्रा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. कर्रा यांनी सांगितले की, शालेय शिक्षणात खंड पडू नये म्हणून आर्थिक मदतीचा पहिला हप्ता या आठवड्यात दिला जाणार आहे.

मे महिन्यात पूंछला दिलेल्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना अशा मुलांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर एक सर्वेक्षण करण्यात आले आणि सरकारी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुलांची यादी तयार करण्यात आली.

आपल्या दौऱ्यादरम्यान गांधी यांनी ख्राइस्ट पब्लिक स्कूलला भेट दिली. हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान पाकिस्तानने या शाळेवर हल्ला केला होता आणि त्यात अनेक विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला होता. या हल्ल्यात थोडक्यात बचावलेले जुळे भावंड उरबा फातिमा आणि झैन अली यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.

राहुल गांधी म्हणाले की, “मला तुमच्यावर खूप गर्व आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण येत असेल. पण काळजी करू नका. सगळं पूर्वीसारखं होईल. भरपूर अभ्यास करा, मनसोक्त खेळा आणि शाळेत खूप मित्र बनवा,” असे राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना सांगितले.

पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधले दहशतवादी तळ नष्ट केले होते. या ऑपरेशनमध्ये हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.