विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड, सभागृहात एकमताने प्रस्ताव मंजूर; शिवसेनेचा बहिष्कार

पंधराव्या विधानसभेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने नार्वेकर यांच्या निवडीची औपचारिकता आज पूर्ण करण्यात आली. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. मात्र शिवसेनेने अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतास टाकला असता एकमताने मंजूर झाला. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी करताच सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांनी बाके वाजवून नार्वेकर यांच्या निवडीचे स्वागत केले.

या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नार्वेकर यांना अध्यक्षपदाच्या आसनावर नेऊन बसवले.

सदस्यांनी केलेल्या अभिनंदनपर भाषणावर आभार मानताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात 288 सदस्यांना समान संधी दिली जाईल असे सांगितले. मॅजेस्टिक आमदार निवासाचे काम एका वर्षात तर मनोरा आमदार निवासाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.