विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, उद्धव ठाकरे यांची मागणी

बिनविरोध निवडणुकांवरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली असून सध्याची परिस्थिती ही झुंडशाही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “ही झुंडशाही सुरू आहे, याला आता लोकशाही म्हणता येणार नाही. आम्ही त्यांची मतचोरी पकडली असून आता उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते महाराष्ट्राला यापूर्वी लाभले नव्हते,” अशी कडक टीका त्यांनी केली. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया राबवली जात आहे, यात जनतेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, नार्वेकर हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून आमदारांवर दमदाटी करत आहेत. स्वतः संरक्षणात राहून दुसऱ्यांचे संरक्षण काढले जात आहे. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते संपूर्ण जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधिमंडळाचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्याकडून निःपक्षपाती कारभार अपेक्षित असतो. अध्यक्ष कुणाच्याही प्रचाराला जाऊ शकत नाहीत, असा लिखित वा अलिखित नियम असतानाही त्यांनी त्याला छेद देणारे उद्दाम वर्तन केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबन केले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. नार्वेकर स्वतःला ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर समजत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संरक्षण देणे आणि काढून घेणे हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना केवळ सभागृहात असतो, बाहेर कुणाचेही संरक्षण काढण्याचा अधिकार त्यांना नाही. निवडणुकीत दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, तेथे निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवले असून शेवटी ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाईल, अशा प्रकारचे नाटक सुरू आहे. त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले असून जेन-झी मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे. त्या वॉर्डमधील निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घेतल्या पाहिजेत; तेव्हाच तुम्ही लोकशाहीचे रक्षण करत आहात असे म्हणता येईल, अन्यथा निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत असा समज जनतेमध्ये निर्माण होईल, तो होऊ देऊ नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.