राहुरीतील बिबट्या अखेर जेरबंद!

राहुरी शहर हद्दीतील वराळेवस्ती येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. या भागातील शेतकऱयांना तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वन विभागाने शुक्रवारी (14 रोजी) भक्ष्य ठेवलेला पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱयात कैद झाला. पिंजऱयातून बाहेर पडण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केले. मात्र, ते व्यर्थ ठरले.

बिबट्याने फोडलेल्या डरकाळीमुळे वराळेवस्ती परिसरातील शेतकऱयांनी घटनास्थळी कानोसा घेतला असता, बिबट्या पिंजऱयात जेरबंद झाल्याचे दिसले. आज सकाळी माहिती मिळताच वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजू रायकर, वनरक्षक प्रियंका दारकुंडे, नीलेश जाधव, वनमजूर पोपट शिंदे, वाहनचालक ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेल्या बिबट्याला डिग्रस (ता. राहुरी) येथील वन विभागाच्या नर्सरीत हलविले.

या भागात आणखी दोन बिबटे असल्याची माहिती शेतकऱयांनी दिल्याने वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती वनपाल राजू रायकर, वनरक्षक प्रियंका दारकुंडे यांनी दिली.

बिबट्याच्या तुलनेत पिंजऱयांची संख्या तुटपुंजी

राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात असल्याने बहुतांशी गावांत बिबट्यांचे वास्तव्य आहे. तालुक्यात बिबट्यांची संख्या 300च्या पुढे गेली आहे. मात्र, तालुक्यात पिंजऱयांची संख्या तुटपुंजी असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बिबट्यांचे वास्तव्य असलेल्या आरडगाव, मानोरी, वळण, मांजरी, बारागाव नांदुर, वडनेर, ताहाराबाद, चिंचाळे, कणगर, गुहा, निंभेरे, सोनगाव सात्रळसह 22 गावांत वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत.

अहिल्यानगरात दोन हजार बिबटे

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. रेकॉर्डनुसार जिल्ह्यात तब्बल साडेअकराशे बिबटे असल्याची नोंद आहे. मात्र, वास्तविक ही संख्या दोन हजारांवर गेल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. यामुळे वन विभागावर प्रचंड ताण असून, बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी विभागाला अतिरिक्त मदत देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

वन विभागाला लागणाऱया साहित्यापासून ते वाहनांपर्यंत सर्व सुविधा डीपीटीसीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातील. याशिवाय, जिल्ह्यात पकडलेल्या बिबट्यांपैकी तब्बल 200 बिबट्यांना ‘वनतारा’ प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षकांसह शाळा समितीवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन कोणतीही जोखीम घेणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, बिबट्या हा शेडय़ूल वनमध्ये असल्याने त्याला ठार करता येत नाही. त्यामुळे त्याला शेडय़ूल–वनमधून वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहोत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.