संशय, संवादाचा अभाव, व्यसनाधीनता; रायगडातील साडेतीन हजार संसार विभक्त होण्याच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
divorce

मानगुटीवर बसलेले संशयाचे भूत, कुटुंबातील वाद-विवाद, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी यांसह इतर कारणांमुळे रायगडात तब्बल साडेतीन हजार संसार विभक्त होण्याच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे प्रलंबित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे साताजन्माच्या आणाभाका घेतलेली जोडपी आपले नाते कायमचे तोडण्याच्या तयारीत आहेत.

शहरांबरोबरच ग्रामीण भागातही घटस्फोटाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. पती-पत्नीमधील मतभेद, आर्थिक अडचणी, व्यसनाधीनता तसेच संवादाचा अभाव ही घटस्फोटाच्या वाढत्या घटनांची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच समुपदेशन केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची प्रकरणे दाखल होत आहेत. अनेक जोडप्यांना समुपदेशनाद्वारे पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी काही प्रकरणांमध्ये तणाव इतका वाढलेला आहे की विभक्त होण्याशिवाय पर्याय उरत नाही. रायगड जिल्ह्यात ३ हजार ४९० संसार विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असून जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ही प्रकरणे प्रलंबित आहेत. घटस्फोटाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवणे, जनजागृती मोहीम राबवणे आणि कुटुंबव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

वर्षभरात ३१ जोडप्यांचा सावरला संसार

रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तुटणाऱ्या ३१ संसाराची घडी बसवत त्यांना ‘नांदा सौख्यभरे’ हा कानमंत्र दिला. पती-पत्नी संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या किंवा वादविवादाच्या गाळात रुतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो. थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोहोचते. घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या पती-पत्नींमधील प्रकरणे तडजोडीसाठी लोक न्यायालयात ठेवण्यात येतात. मागील वर्षभरात लोक अदालतींमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ३१ पती-पत्नी जोडप्यांच्या नात्यात आलेला दुरावा तडजोडीअंती दूर करून त्यांच्यातील रेशीमगाठी पुन्हा जुळवण्यात यश मिळवले असल्याची माहिती रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिली आहे