
अलिबागजवळच्या समुद्रात मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या बोटीवर एकूण 8 खलाशी होते. त्यापैकी पाच खलाशी पोहत किनाऱ्यावर आले. तर अन्य तीज जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बचावलेल्या पाच जणांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करंजा येथील आठ खलाशी शनिवारी सकाळी 7 वाजता मासेमारीसाठी बोट घेऊन समुद्रात गेले. तासाभरानेच सकाळी 8 वाजता खांदेरी किल्ल्याजवळ लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे बोट समुद्रात बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहत दिघोडी किनारा गाठला.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावलेल्या खलाशांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मासेमारीवर बंदी असतानाही हे खलाशी समुद्रात मासेमारीसाठी गेले. बेपत्ता खलांशाचा शोध सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.