
उपनगरी रेल्वे मार्गावर सर्व वातानुकूलित लोकल चालवल्या जातील आणि त्यांचे तिकीट दर सध्याच्या सामान्य लोकलच्या तिकीट दराइतकेच असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. ती घोषणा ‘फुसका बार’ ठरणार आहे. सामान्य लोकलच्या दरात एसी लोकल चालवणे अशक्य असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गारेगार प्रवास मुंबईकरांचा खिसा कापणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. त्या घटनेमुळे सरकारच्या अपयशावर टीका झाली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नजिकच्या काळात 268 नवीन एसी लोकल चालवणार असल्याचे जाहीर केले. किंबहुना एसी लोकलचे तिकीट साध्या लोकलइतकेच असेल, असे त्यांनी म्हटले. मात्र एसी लोकलचे तिकीट साध्या लोकलइतके ठेवणे अशक्य असल्याचे पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकिट तिप्पटीने अधिक आहे. तिकीट दर समान करुन रेल्वे प्रशासन मोठा आर्थिक तोटा सहन करु इच्छिणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसी लोकलच्या आडून सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मोठी तिकीट दरवाढ मारण्याचा प्रयत्न असल्याचेच स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर एसी लोकलच्या धोरणाला प्रवासी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
ती घोषणा राजकीय आश्वासन!
तिकीट दरनिश्चितीचा विषय रेल्वे मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येतो. असे असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसी लोकलचे तिकीट सामान्य लोकलच्या तिकीट दराइतके ठेवण्याची घोषणा कशी केली याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांची घोषणा निव्वळ राजकीय आश्वासन असू शकते, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
लोकलमधून पडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसवण्याची पडताळणी केली जात आहे. त्या अनुषंगाने ‘आयसीएफ’मार्फत सुरुवातीला एक रेक बनवला जात आहे. साधारण सहा महिन्यांमध्ये रेक बनेल. त्यानंतर त्या रेकची चाचणी घेतली जाईल. प्रवाशांचे ‘फीडबॅक’ विचारात घेऊन लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.