तब्बल 1484 समर स्पेशल ट्रेन धावणार, प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी किंवा फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वेने नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत काही गाडय़ांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत तर, काही नवीन विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहे. रेल्वेने यंदा 1 हजार 484 उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात 749 आरक्षित तर 735 अनारक्षित रेल्वेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांसाठी दरवर्षी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. याशिवाय राज्याबाहेरील प्रवाशांसाठीही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष ट्रेनमुळे गाडय़ांमुळे उत्तरेकडे  तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने स्थानकांवर अतिरिक्त व्यवस्था करण्याचेही नियोजन केले आहे. या सर्व विशेष गाडय़ांचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दानापूर, पुणे ते गोरखपूर आणि दानापूर ते पुणे या मार्गांवरील रोजच्या विशेष ट्रेनचा समावेश आहे. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना उन्हाळ्यातील प्रवासाचे नियोजन करता येईल आणि गर्दीमुळे निर्माण होणारी अडचण टाळता येईल.

विशेष ट्रेन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यानच्या मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. यात मुंबई/दौंड ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, नाशिक रोड ते बडनेरा आणि हडपसर ते हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे.

महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांसाठीही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत. मुंबई ते बलिया, मुंबई ते गोरखपूर, दौंड ते कलबुर्गी आणि सोलापूर ते कलबुर्गी/अनकापल्ली या मार्गांवर देखील गाडय़ा धावतील.

मध्य रेल्वेकडून खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज या दोन ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर खडकी इंदूर साप्ताहिक विशेष आणि हडपसर -प्रयागराज साप्ताहिक विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या ट्रेनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.