मुंबई परिसरात आज मेघगर्जनेसह पाऊस, ठाणे जिह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर उपनगरांसह आसपासच्या परिसरात गुरुवारपासून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागांत पुढील काही दिवस विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान मुंबईतही पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ठाणे जिह्याला पावसाचा येलो अलर्टजारी करण्यात आला आहे

गुरुवार, 2 एप्रिल रोजी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा सुटणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. दिवसभरात ताशी 30ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शहराच्या हवामानातील या बदलामुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. हलक्या वाऱ्यांमुळे शहरातील धुरके आणि वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये सुधारणा झाली आहे. वातावरणात झालेल्या या बदलादरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लागणार आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागांतही हवामान खात्याने पावसाच्या हजेरीचा अंदाज वर्तवला आहे. खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भातील जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागांसाठी अवकाळी पावसाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना ऑरेंज अलर्टजारी करण्यात आला आहे. संबंधित भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.