
‘मुंबई मराठी माणसाची असून ती आपल्याला वाचवायची आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका,’ असा संदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना दिला.
मनसेच्या सर्व 53 उमेदवारांनी आज ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर या सर्वांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला व काही सूचना केल्या. ‘निवडणूक लढताना तुम्हाला पैशाच्या अनेक ऑफर येतील. वेगवेगळी आमिषे दाखवली जातील, पण तुम्ही ठाम राहा. मलाही अनेक ऑफर्स आल्या होत्या. मी त्या ठामपणे नाकारल्या, सगळ्यांना पळवून लावलं. तुमचीही भूमिका तीच असली पाहिजे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका,’ असे राज ठाकरे यांनी सांगितले.
बोगस मतदार दिसला तर फटकवून काढा!
मतदानाच्या दिवशी पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या. ‘बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीचे व्यवस्थापन चोख करा. प्रत्येक बूथवर आपली 10 माणसे उभी करा. एखादा बोगस मतदार आढळल्यास त्याला जागेवरच फटकवून काढा,’ असेही राज ठाकरे यांनी सांगितले.






























































