एकाच उद्योगपतीची मोनोपॉली झाल्यास देश बरबाद होईल! राज ठाकरे यांचा अदानींवर पुन्हा हल्ला

‘केंद्र सरकारच्या ‘रेड कार्पेट’ धोरणामुळे अदानी यांनी अवघ्या दहा वर्षांत देशातील या सर्व उद्योगपतींना मागे टाकले आहे,’ असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी यांच्यासह केंद्र सरकारवर केला. ‘एकाच उद्योगपतीची सर्व क्षेत्रामध्ये ‘मोनोपॉली’ निर्माण झाल्यास देश बरबाद होईल. तो माणूस संपूर्ण देशाला वेठीस धरू शकतो. मुख्यमंत्र्यांनी हा धोका ओळखण्याची गरज आहे,’ असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारच्या ‘रेड कार्पेट’मुळे अदानी यांनी अवघ्या 10 वर्षांमध्ये टाटा, बिर्ला, अंबानी आदी उद्योगपतींना मागे टाकले. माझा कोणत्याही उद्योगपती किंवा उद्योगसमूहाला विरोध नसून, एकाच उद्योगपतीसाठी केंद्र सरकार रेड कार्पेट अंथरते, यावर माझा आक्षेप आहे. सिमेंट, पोर्ट, एअरपोर्ट, वीज आदी सर्व गोष्टींमध्ये एकाच व्यक्तीची मोनोपॉली येते तेव्हा तो माणूस देशाला वेठीस धरू शकतो, असे ते म्हणाले.

अदानींना अर्थसाहाय्य कोठून झाले?

उद्योग उभे करताना अदानींना अर्थसाहाय्य कोठून झाले? कोणकोणत्या बँकांना व वित्तीय संस्थांना त्यांना अर्थसाहाय्य करायला लावले, हे पाहावे लागेल. एकाच उद्योजकाकडे मोनोपॉली गेल्यानंतर जर उद्या अदानी समूहातील गोष्टी कोलमडल्या तर एअरपोर्ट, पोर्ट, वीज, सिमेंट, स्टील सगळे ठप्प होईल. अनेकांच्या नोकऱ्या जातील. संपूर्ण देश ठप्प होईल. देश बरबाद होईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना धोका कळलाही असेल, पण ते बोलणार कोणाला?

सर्व क्षेत्रांमध्ये मोनोपॉली तयार झाली तर अदानी उद्या देशाला वेठीस धरू शकतात. याचे उत्तम उदाहरण हे इंडिगोचे आहे. इंडिगोने संपूर्ण देश अक्षरशः वेठीस धरला. इंडिगोकडे विमान प्रवासाचा 65 टक्के वाटा आहे. या एका विमान कंपनीने व्यवसाय बंद केल्याने देशाचे काय हाल झाले हे सर्वांनी पाहिले. तसेच अदानी यांच्याबाबतही घडू शकते. हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांना हा धोका कळलाही असेल, पण ते बोलणार कोणाला, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला.