
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. त्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन शहरांतील वाहतूक 32 तास ठप्प होते आणि सरकार त्याकडे स्वस्थपणे बघते, हा कोडगेपणा अनाकलनीय आहे, अशी टीका करतानाच, प्रवाशांचा टोल परत करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांच्या प्रेरणेतून साकारलेल्या मुंबई-पुणे महामार्गाला 24 वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं.





























































