
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे. ठाणे महापालिकेला भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी केले असून आता अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत. ठाणे महापालिकेत लुटमार, भ्रष्टाचार सुरू असून या कामांचे ऑडिट झालेच पाहिजे. शिंदेंच्या काळातील कामांची जशी मुंबईत चौकशी सुरू केली तशी ठाणे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा आणि लुटालूट थांबवा अशी मागणी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मिंधे आणि त्यांच्या टोळीने ठाण्यात सुरू केलेल्या लुटमारीचा समाचार घेतला. ते म्हणाले, मिंधेंच्या गद्दार टोळीने ठाणे महापालिका लुटून खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या मूलभूत सोयीसुविधांचे बारा वाजले आहेत. ठाणे महापालिकेकडे स्वतःच्या हक्काचे साधे धरणही नाही. शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनधिकृत बांधकामांचा तर प्रचंड सुळसुळाट झाला असून गेल्या अडीच वर्षांत सर्व नागरी कामे रखडली आहेत. ज्याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप राजन विचारे यांनी केला. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण उपस्थित होते.
ठाणे महापालिकेचे ना स्वतःचे हक्काचे धरण आहे ना स्वतःचे डंपिंग ग्राऊंड. ठाण्याची वाट लागली आहे. जनतेच्या पैशांची रखवाली मुख्यमंत्री करतात असा संदेश सगळीकडे जात आहे. मग शिंदेंच्या काळातील कामांची चौकशी जशी मुंबईत सुरू केली तशी ठाणे महापालिकेच्या कामांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी सुरू करावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ.
चुकीची कामे रोखण्यासाठी चांगला अधिकारी महापालिकेत पाठवा
ठाणे महापालिकेच्या कारभाराला आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे. चुकीचे काम घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालावे आणि सरकारचा एक चांगला अधिकारी महापालिकेत पाठवावा अशी मागणीही राजन विचारे यांनी केली आहे.
n मुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाण्याची सुधारणा करायला हवी होती. पण रोज उठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणे आणि कार्यकर्त्यांना त्रास देणे याशिवाय त्यांनी काहीही केले नाही.
n धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक झाले नाही, पण मिंधेंचे दोन-दोन बंगले मात्र झाले.
n सुंदर ठाण्याचा नकाशा बदलून ठाणे बदसुरत केले.