
राजस्थानमधील भिवाडी येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार या आगीत 6 ते 7 मजुरांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अनेक मजुरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत अजूनही काही मजूर आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्या वेळी हा स्फोट झाला, तेव्हा फॅक्टरीमध्ये साधारण 20 ते 25 मजूर काम करत होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. यादरम्यान काही मजुरांनी प्रसंगावधान राखत फॅक्टरीतून बाहेर धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. मात्र, आत अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने बचाव कार्य राबवले जात आहे.
























































