सावधान! राजस्थानमधील ‘स्नो यार्ड’ ठरतोय पर्यटकांसाठी धोकादायक; सोशल मीडियावर कॅन्सरच्या धोक्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथील एका पर्यटन स्थळाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पांढऱ्याशुभ्र बर्फासारख्या दिसणाऱ्या या ठिकाणाला पर्यटक ‘स्नो यार्ड’ समजून तिथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र, हा दिसणारा पांढरा थर बर्फ नसून अत्यंत विषारी रासायनिक कचरा असल्याचे समोर आले आहे. यामुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा इशारा दिला आहे. एकीकडे पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असताना राजस्थानमधील हे ‘फेक स्नो यार्ड’ चिंतेचा विषय ठरत आहे.

किशनगडमधील हे ठिकाण प्रत्यक्षात मार्बल उद्योगातून निघणाऱ्या कचऱ्याचे डंपिंग यार्ड आहे. मार्बल कापताना निघणारी पांढरी पावडर आणि पाण्याचे मिश्रण साचून तिथे एक विस्तीर्ण पांढरा प्रदेश तयार झाला आहे. लांबून पाहिल्यास हे ठिकाण कश्मिर किंवा स्वीत्झर्लंडमधील बर्फाच्छादित प्रदेशासारखे दिसते. याच सौंदर्याला भुलून अनेक पर्यटक तिथे रील बनवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी जात आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तज्ज्ञ आणि जागरूक नागरिकांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. हा मार्बल स्लरीचा कचरा कॅल्शियम कार्बोनेट आणि विविध रसायनांनी बनलेला असतो. या कचऱ्याच्या संपर्कात आल्यास किंवा तिथली धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे आजार, त्वचेचे विकार आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, असा इशारा दिला जात आहे.

इंटरनेटवर अनेकांनी पर्यटकांच्या या कृत्यावर टीका केली आहे. “फक्त काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालणे चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालावी आणि तिथे धोक्याचे फलक लावावेत, अशी मागणीही आता जोर धरत आहे.