आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला जरी धक्का बसला ना तर, तुम्ही बघा काय होईल ते; सुप्रिया सुळे यांचा इशारा

supriya-sule

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेवरून सध्या शिवप्रेमींसह राज्यभर संतापाची भावना आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात महाविकास आघाडी शिवप्रेमींकडून बुधवारी 28 ऑगस्ट रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र राणे समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिली आहे. शिवाय जे झाले ते अत्यंत चुकीचे आहे. आमच्या सर्व नेत्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची. पण आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला जरी धक्का बसला ना तर तुम्ही बघा काय होईल ते, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तिथली कायदा सुव्यवस्था काय चालली आहे? पोलिसांची यंत्रणा आहे ना तिथे? ती काय करत आहे? आमचे नेते तिथे सगळे जाणार होते हे सगळ्यांनाच काल माहित होते ना? म्हणजे जयंत पाटील जाणार होते, तिथले स्थानिक नेते सगळे जाणार होते. तर मग या सरकारचे इंटेलिजन्स काय करत आहेत. माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवींसाना विनंती आहे की, त्यांनी गृहमंत्री म्हणून अपिल केले पाहिजे की, सर्वांनी शांततेची भूमिका घ्यावी आणि शांततेतून यावर मार्ग काढावा. सर्व जाणार होते हे काल टिव्हीवर दाखवले जात होते. मग पोलीस यंत्रणा किंवा त्यांच्या इंटेलिजन्सला हे माहित नव्हते का? आमच्या सर्व नेत्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला जरी धक्का बसला ना तर तुम्ही बघा काय होईल ते, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.