
राजस्थानमधील पहिली मुलींची सैनिक शाळा पुढील वर्षी 2026 पासून सुरू होणार आहे. बिकानेर येथे ही शाळा सुरू होणार असून मूळचे बिकानेरमधील रहिवासी आणि सध्या कोलकाता येथील उद्योजक पूनमचंद राठी यांनी या सैनिक शाळेसाठी 108 कोटी रुपयांची मालमत्ता दान केली आहे. ही शाळा हिंदुस्थान-पाकिस्तानपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयमलसर गावात सुरू केली जाणार आहे.
राज्य सरकारने 2024-25 आणि 2025-26 मध्ये या शाळेची घोषणा केली होती. शाळेत फक्त सहावी आणि नववीच्या वर्गात मुलींना प्रवेश मिळेल. प्रत्येक वर्गात 80 मुलींना प्रवेश दिला जाईल. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शाळेत सर्व तयारी केली जाईल. सध्या राज्यात एपूण 9 शाळा सुरू करण्याची योजना आहे. श्री गंगानगरमध्ये एक शाळा बांधली जाईल. जी एक सामान्य सैनिक शाळा असेल. सर्व 9 सैनिक शाळांमध्ये विज्ञानाचे सर्व विषय शिकवण्याची व्यवस्था असेल. या शाळांमध्ये पूर्ण वसतिगृह सुविधा असतील. त्यांच्या परीक्षा राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जातील. राजस्थानमध्ये उघडल्या जाणाऱ्या इतर सैनिक शाळादेखील चित्तोडगडमधील सैनिक शाळेप्रमाणे चालवल्या जातील. प्रत्येक शाळेतील प्राचार्य आणि वसतिगृह वॉर्डन हे सैन्यातील निवृत्त अधिकारी असतील. ट्रस्टचे संचालक पूनमचंद राठी म्हणाले की, त्यांनी त्यांच्या पालकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही इमारत आणि जमीन सरकारला दान केली आहे.
राठी कुटुंबाचा दानशूरपणा
रामनारायण राठी कुटुंब हे बिकानेरच्या जयमलसर येथील आहे. कोलकाता येथील हे व्यावसायिक कुटुंब मोठय़ा व्यावसायिक घराण्यांमध्ये गणले जातेय. या कुटुंबाचा कापड आणि बांधकाम व्यवसाय आहे. व्यवसायासोबतच हे कुटुंब सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. बिकानेर जिह्यात या कुटुंबाच्या ट्रस्टने रुग्णालय वॉर्ड, धर्मशाळा, शाळेची इमारत यांसह अनेक बांधकामे केलेली आहेत.