रक्षाबंधनात 17 हजार कोटींची उलाढाल होणार, भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात लाडक्या बहिणींची लगबग

राखी पौर्णिमेसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात खरेदीची लगबग दिसत आहे. यंदा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजानुसार, या वर्षी रक्षाबंधनानिमित्त देशभरात सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा व्यापार होऊ शकतो. मिठाई, फळे आणि भेटवस्तूच्या रूपात अंदाजे चार हजार कोटी रुपयांची खरेदी होऊ शकते. याशिवाय अन्य वस्तूंची हजारो कोटींची उलाढाल होऊ शकते.

मागील वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सुमारे 12 हजार कोटींची उलाढाल झाली होती. 2023 साली अंदाजे 10 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. या वर्षी त्यामध्ये 22.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये 17 हजार कोटी रुपये एवढा व्यवसाय होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे.

g बाजारात पारंपरिक राख्यांसोबत थीमवर आधारित राख्यांची चलती आहे. इकोफ्रेंडली राख्यांनाही मागणी आहे. माती-बिया, बांबू, खादी, कापूस अशा पर्यावरणपूरक राख्या खरेदीकडे कल दिसत आहे. स्थानिक महिला उद्योग, बचत गटाच्या महिलांना राख्या तयार करण्याचे काम मिळाले आहे.