
पुण्यातील गुंड नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देण्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यामुळे मुलाच्या बचावासाठी पुढे आलेल्या माजी मंत्री रामदास कदम यांनी विधिमंडळातील एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगितले. आदेश देणारी ही व्यक्ती कोण? या प्रकरणात रामदास कदम यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनाच लपेटल्याची चर्चा आहे.
सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होऊ लागताच रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मुलाचा बचाव केला. विधिमंडळातील एका बडय़ा व्यक्तीच्या सूचनेनुसार योगेश कदम यांनी हा निर्णय घेतला. ती व्यक्ती मंत्र्यांनाही आदेश देते. ती व्यक्ती न्यायाधीशच आहे. योगेश कदम यांनी त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. ती मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्याने शिफारस केल्यानंतर, त्याच्या दृष्टीने ती व्यक्ती स्वच्छ असेल असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला, असे रामदास कदम म्हणाले.
योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत. मंत्री म्हणून त्यांना काही अधिकार असतात. एखाद्यावर एकही केस नाही, असे त्यांचे समाधान झाले आणि संबंधित शिक्षक किंवा बिल्डर असेल अथवा कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो, असा दावा कदम यांनी केला.
सचिन घायवळवर एकही गुन्हा नाही – योगेश कदम
सचिन घायवळ यांच्यावर 15-20 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते, परंतु 2019 साली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील 10 वर्षांत त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतला गेला, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
अद्याप शस्त्र परवाना दिला नाही – पोलीस आयुक्त
आरोपी सचिन घायवळने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सचिनने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडे अपील केले होते. त्यानुसार अपिलावर सुनावणी घेताना त्याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश कदम यांनी 20 जून 2025 रोजी पुणे पोलिसांना दिले होते. मात्र, याबाबत आतापर्यंत आम्ही सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नीलेश घायवळ राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल
कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार आरोपी गुंड नीलेश घायवळ आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये गुंड नीलेश घायवळ हा राम शिंदेंच्या पाया पडताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी नीलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत आहे. यावरून राजकीय वरदहस्ताशिवाय गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट आणि व्हिसा मिळणे शक्य नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.






























































