
समर्थानी समाजव्यवस्थेच्या प्रत्येक बाजूला स्पर्श केला यातील एक सुजाण भूमिका म्हणजे रामदासी पंथातील स्त्रीशक्ती. संपूर्ण पुरुषप्रधान अशा या संप्रदायात त्यांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले. समर्थांच्या प्रमुख विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या अठरा स्त्री शिष्यांपैकी एक म्हणजे अक्काबाई स्वामी. त्या मूळच्या कराड शेजारील शहापूरच्या. त्या विधवा होत्या पण मनाने अत्यंत कणखर होत्या. समर्थांच्या उत्तरकाळात अक्काबाई स्वामींनी समर्थांची सेवा केली.
पूर्ण संप्रदायात `स्वामी’ हे विशेषणात्मक पदवी मिळवलेल्या दोनच स्त्री रामदासी म्हणजे मिरजच्या वेणास्वामी आणि अक्कास्वामी. अक्कास्वामींनी समर्थांच्या पश्चात अडतीस वर्षे सज्जनगड आणि चाफळचा कारभार सांभाळला. यवनांच्या मूर्तीभंजक,धर्मउच्छेदक वृत्तीला टक्कर देत धर्म आणि अधर्माच्या लढाईत अक्कास्वामी निश्चलतेने रामसेवा, समर्थसेवा करत होत्या. औरंगजेबाच्या सज्जनगडवरील आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन अक्कास्वामी,उध्दवस्वामी आणि परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी आदींनी राममूर्तीं वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवल्या. समर्थ समाधी तात्पुरती भिंतीआड बंद करून अबाधित ठेवली.
























































