
पहिल्या डावात अवघ्या 120 धावांत गारद झाल्यानंतर मुंबईची सामन्यावरील पकड सैल झाली होती आणि कर्नाटक वर्चस्व गाजवेल असेच चित्र होते. मात्र दुसऱया डावात मुंबईने झुंजार पुनरागमन करत 377 धावा केल्या आणि रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीत जबरदस्त रंगत आणली. अखेर 325 धावांचे आव्हान मिळालेल्या कर्नाटकने तिसऱया दिवसअखेर दोन विकेट गमावत 113 धावांची मजल मारली असून तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल 60 तर करुण नायर 9 धावांवर खेळत होता. कर्नाटकला आता उर्वरित दोन दिवसांत विजयासाठी 212 धावांची गरज आहे.
कर्नाटकच्या या आशादायक वाटचालीचा कणा ठरला के.एल. राहुल. अनुभवी फलंदाजाने संयम, तंत्र आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधत नाबाद 60 धावांची खेळी साकारली. 94 चेंडूंमध्ये सात चौकारांची सजलेली ही खेळी कर्नाटकच्या डावाला स्थैर्य देणारी ठरली. राहुलने कर्णधार देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱया विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईच्या गोलंदाजांचा उत्साह कमी केला. पडिक्कल 39 धावांवर बाद झाला, तर दिवसअखेर करुण नायर 9 धावांवर राहुलला साथ देत होता.
याआधी दुसऱया डावात मुंबईने कालच्या दोन बाद 189 धावांवरून पुढे खेळ सुरू करताना धावफलकात आणखी 188 धावांची भर घातली. यष्टिरक्षक आकाश आनंदने 70 धावांची उपयुक्त खेळी केली, तर मुशीर खान 49 धावांवर थांबला. तळाच्या फळीत तनुष कोटियन (नाबाद 48) आणि तुषार देशपांडे (47) यांनी झुंजार फलंदाजी करत मुंबईला 98.3 षटकांत 377 धावांपर्यंत पोहोचवले. कर्नाटककडून शिखर शेट्टीने तीन विकेट घेत प्रभावी मारा केला, तर विद्याधर पाटील आणि विद्वथ कावेरप्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

























































