बलात्कारी राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 40 दिवसांसाठी येणार तुरुंगाबाहेर

दिल्लीच्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकार हत्येच्या प्रकरणांत आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा 40 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर येत आहे. दुपारी 12 वाजता त्याची जेलमधून सुटका करण्यात येणार असून या कालावधीत तो सिरसा येथील डेरा सच्चा सौदा मुख्यालयात राहणार आहे. सध्या राम रहीम आपल्या दोन शिष्यिणींसोबत बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

ऑगस्ट 2017 मध्ये बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर गुरमीत राम रहीमला तुरुंगात डांबण्यात आले. यावेळी तो 15व्यांदा पॅरोलवर बाहेर येणार आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सुनारिया जेलमधून बाहेर आला होता. एप्रिलमध्ये त्याला 21 दिवसांची पॅरोल देण्यात आली होती. जानेवारीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक आठवड्याने त्याला 30 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते आणि तो तेव्हा सिरसा येथील डेरा मुख्यालयातच राहिला होता. यापूर्वी तो पॅरोलवर असताना उत्तर प्रदेशातील बागपत येथील डेराच्या आश्रमातही राहिला होता.

सिरसा येथे पोहोचल्यानंतर त्याने आपल्या अनुयायांना व्हिडिओ संदेश जारी केला आणि डेरामार्फत जाहीर होणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याला डेरामध्ये प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर अनुयायांना एकत्र करण्यास परवानगी नाही, मात्र तो त्यांच्या संपर्कात व्हर्च्युअल माध्यमातून राहू शकतो.

ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील न्यायालयाने दोन बलात्कार प्रकरणांत राम रहीमला दोषी ठरवत 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येक पीडितेला 15 लाख रुपये दंड म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शिक्षेनंतर त्याच्या समर्थकांनी मोठा हिंसक उद्रेक केला आणि सुरक्षा दलांशी चकमकी झाल्या. पंचकुला आणि सिरसा येथे झालेल्या या हिंसाचारात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर राम रहीम याला पंचकुलामधून हेलिकॉप्टरद्वारे रोहतकच्या सुनारिया तुरुंगात हलवण्यात आले.

पॅरोलच्या इतिहासाकडे पाहिले तर गुरमीत राम रहीम 24 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्यांदा एका दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आला. 21 मे 2021 रोजी आजारी आईला भेटण्यासाठी 12 तासांची पॅरोल देण्यात आली. 7 फेब्रुवारी 2022 रोजी 21 दिवसांची, जून 2022 मध्ये 30 दिवसांची, 14 ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांची पॅरोल त्याला मिळाली. त्यानंतर 21 जानेवारी 2023 रोजी 40 दिवस, 20 जुलै 2023 रोजी 30 दिवस, 21 नोव्हेंबर 2023 रोजी 21 दिवस, 19 जानेवारी 2024 रोजी 50 दिवस, 13 ऑगस्ट 2024 रोजी 21 दिवस, 2 ऑक्टोबर 2024 रोजी 20 दिवस, 28 जानेवारी 2025 रोजी 30 दिवस, 9 एप्रिल 2025 रोजी 21 दिवस आणि 5 ऑगस्ट 2025 रोजी 40 दिवसांच्या पॅरोलवर त्याची सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा 40 दिवसांच्या पॅरोलवर तो बाहेर येणार असल्याने डेरा मुख्यालय आणि आसपासच्या भागात प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.