कथा एका चवीची- लिट्टी चोखा – यूपीवाली दावत

>> रश्मी वारंग

अतिशय साधासोपा आणि रस्त्यावर खाल्ल्या जाणाऱया पदार्थांमधला खमंग तरीही पौष्टिक असा हा लिट्टी चोखा बिहार, झारखंड, पूर्वांचल इथल्या कामगार आणि शेतकरी वर्गामध्ये प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक महत्त्व असणारा हा पदार्थ अस्सल मातीशी जुळलेली नाळ आणि चव यामुळे इतर पदार्थांच्या शर्यतीत स्वतचे अस्तित्व दर्शवतो.

जसजशी थंडी वाढत जाते, मातीशी नाळ सांगणाऱया पदार्थांची रंगतही वाढत जाते. असाच अस्सल भारतीय मातीमधला, विशेष करून बिहार प्रांतात चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे लिट्टी चोखा. नावावरून तरी या पदार्थाविषयी कोणताही बोध होत नाही, पण अतिशय साधासोपा आणि भारतीय धान्य तसेच भाज्यांचा मुबलक वापर करून घेणारा हा पदार्थ आहे. रस्त्यावर खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमधल्या खमंग तरीही पौष्टिक अशा या पदार्थाची ही कहाणी.

लिट्टी आणि चोखा यामध्ये दोन विविध पदार्थ एकत्र बांधले गेले आहेत. सत्तू आणि गव्हाचं पीठ यांचा वापर करून लिट्टी तयार होते, तर चोखा तयार करण्यासाठी विविध भाज्या लागतात. लिट्टीला बाटी, भौरी, भाबरी अशी अनेकविध नावं आहेत. गव्हाच्या कणकेच्या गोळ्यात भाजलेले बेसन, सत्तू, मसाले आणि अन्य गोष्टी भरल्या जातात. नंतर कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्यांवर हे गोळे भाजले जातात आणि विविध भाज्या, जसं की, वांगं, टोमॅटो आणि बटाट्य़ापासून बनवलेल्या चोख्याबरोबर वाढले जातात. चोखा म्हणजे एक प्रकारे भरीतच. बिहार, झारखंड, पूर्वांचल इथल्या लोकांचं हे नियमित खाणं आहे. विशेष करून कामगार आणि शेतकरी वर्गामध्ये प्रसिद्ध असलेला हा पदार्थ आहे आणि या प्रसिद्धीचं मूळ कारण म्हणजे इतर पदार्थांच्या तुलनेत तो अधिक काळ टिकतो. हे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजले जातात. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. तत्कालीन सैनिकांसाठीदेखील हे महत्त्वाचे खाणे होते.

भारताप्रमाणेच नेपाळचेही हे महत्त्वपूर्ण खाणे आहे. नेपाळमध्ये लिट्टी आचार वा मोमोबरोबर दिली जाते, तर पश्चिम बिहार आणि पूर्वीय उत्तर प्रदेशात लिट्टीसोबत मुर्ग कुर्मा खाण्याची पद्धत आहे. या प्रांतात लिट्टी चोखाला विलक्षण सांस्कृतिक महत्त्व आहे. जसं महाराष्ट्रात चतुर्थीला मोदक, होळीला पोळी असतेच, तशी या प्रांतात महत्त्वाच्या सणांना लिट्टी चोखा बनवण्याची परंपरा आहे.

लिट्टी सत्तूची बनलेली असल्याने दाल बाटी इतकी ती लोकप्रिय झाली नाही, पण 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात तात्या टोपे व राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्याला या लिट्टीने खूपच आधार दिला. प्रवासात भांडी न वापरताच पटकन तयार होणारी व बाटीपेक्षा मऊ लिट्टी सैन्यासाठी सोयीची होती. राणी लक्ष्मीबाईंना लिट्टी चोखा हा पदार्थ खूप आवडायचा असं म्हणतात. फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये स्ट्रीट फूडचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यात भारतीय पदार्थ म्हणून लिट्टी चोखा दाखल झाला होता.

दाल बाटी चुरमाप्रमाणे लिट्टी चोखासुद्धा दीर्घकाळ टिकणारा, प्रवासात खाता येणारा लोकप्रिय पदार्थ, पण हा पदार्थ उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरापुरताच मर्यादित राहिलेला दिसतो. भारतभरात लोकप्रिय होण्याची संधी त्याला मिळाली नाही. तरीही उत्तर प्रदेशचं खाणं जिथे जिथे मिळतं तिथे तिथे लिट्टी चोखा प्रसिद्ध आहे. अस्सल मातीशी जुळलेली नाळ आणि चव यातून इतर पदार्थांच्या शर्यतीत या पदार्थाने स्वतचं अस्तित्व निर्माण केलं आहे हे नक्की.