
मिरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका 89 वर्षीय वृद्ध महिलेचा हात उंदराने कुरतडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुहासिनी दामोदर माठेकर (89) असे या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 12 मार्च 2026 रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी अत्यंत स्वच्छता आणि डॉक्टरांचे चोवीस तास लक्ष असणे अपेक्षित असते, त्याच आयसीयू कक्षात रात्रीच्या वेळी उंदराने सुहासिनी यांच्या हाताला अक्षरशः कुरतडून काढले. सकाळी सहाच्या सुमारास जेव्हा नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना सुहासिनी यांच्या हातावर जखमा दिसल्या आणि जवळून उंदीर पळताना आढळला.
या प्रकारामुळे धक्का बसलेल्या नातेवाईकांनी तातडीने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना या गंभीर प्रकाराची साधी पुसटशी कल्पनाही नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “आमची आजी आधीच गंभीर अवस्थेत असताना आयसीयू सारख्या संवेदनशील ठिकाणी उंदीर फिरत असतील, तर रुग्णालयाची स्वच्छता कुठे गेली? रात्रीच्या वेळी कोणाचेच लक्ष नव्हते का?” असा संतप्त सवाल त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे मिरा-भाईंदरमधील एकमेव मोठे सरकारी रुग्णालय आहे. मात्र, येथे वारंवार डॉक्टरांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ आणि अस्वच्छतेच्या तक्रारी समोर येत असतात. आयसीयूमध्ये घडलेल्या या ताज्या प्रकरणामुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णाची ही अवस्था पाहून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
























































