
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील थकित कर्जदारांविरोधात कर्जवसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे व योग्यच असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या एकूण 13 शाखा असून अन्य कोणत्याही शाखेत कर्ज वा अन्य कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार वा व्यवहार झालेला नाही, मात्र ज्या रत्नागिरी शाखेत अशा प्रकारे काही कर्जांचे शाखाधिकाऱ्याने नियमबाह्य वितरण केले असल्याचे आढळून आले, त्या शाखाधिकाऱ्याचे निलंबन करून त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी अन्य दोषी अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरू असून तशा नोटीस त्यांना बजावण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली.
थकित असलेल्या 31 कर्जदारांविरोधात बँकेने कर्जवसुली प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत कारवाई सुरू केलेली आहे. तर आणखी 18 कर्जदारांविरोधात ती प्रस्तावित असून तीही केली जाणार आहे. बँकेने केलेली ही कारवाई योग्यच असल्याचे नमुद करताना या कर्जदार सभासदांना याबाबत काहीच माहित नाही, हे त्यांचे म्हणने चुकीचे असल्याचे त्यांनी नमुद केले. राजापूर अर्बन बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळे बचत वा कर्जखात्यात पैसे जमा होणे, वजा होणे याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर येतो, तर गृह कर्ज घेणाऱ्यांनी थेट बिल्डरच्या खाती पैसे वर्ग करण्याच्या सुचना दिलेल्या असतात व त्यांच्याच सुचनेने ते पैसे वर्ग होतात व याबाबतही मेसेज येतात. त्यामुळे अशा प्रकारे आता आम्ही कर्ज घेतलेले नाही, आम्हाला माहित नाही, अशी बोंब करून नाहक बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असल्याचेही त्यांनी नमुद केले.