Ratnagiri News – संगमेश्वर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; ठेकेदाराच्या धुळीत जनता गुदमरतेय

संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता आता प्रवासासाठी नव्हे, तर अपघात आणि आजारांचा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदार, मनमानी आणि सुलतानशाही कारभारामुळे संगमेश्वरकर अक्षरशः धुळीत गुदमरून जगत आहेत. मात्र जनतेच्या जीवावर उठलेला हा प्रकार दिसूनही संबंधित प्रशासन अजूनही गाढ झोपेत आहे.

महामार्गावर ठिकठिकाणी माती, काँक्रिट व गौण खनिजे सांडून ठेवण्यात आली आहेत. निकामी साहित्य रस्त्यावरच टाकून देण्यात आले असून सुरक्षेच्या नावाखाली एक फलकही दिसत नाही. रात्रीच्या वेळी तर हा महामार्ग थेट मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. धुळीने संपूर्ण महामार्ग झाकोळला असून गेले अनेक दिवस पाण्याचा थेंबही टाकण्यात आलेला नाही. मटेरियल वाहून नेणारे ट्रक झाकले जात नाहीत, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड धुरळा उडतो आहे. वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसून अपघात टळत असतील, तर ते केवळ नशिब बलवत्तरच म्हणावे लागेल.

या उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालक, प्रवासी जनता आणि संगमेश्वरातील नागरिकांच्या फुफ्फुसात विषारी कण जात आहेत. लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, वृद्धांचे आजार बळावत आहेत. डोळ्यांची जळजळ, दम्याचे झटके, श्वसनाचे विकार वाढत असताना ठेकेदार मात्र मग्रुरीत आपली कामे रेटत आहे. ठेकेदारचा हा सुलतानशाही कारभार रोखण्याची जबाबदारी ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि स्थानिक प्रशासनावर आहे, ते नेमके कुठे गायब आहे? एखाद्याचा जीव गेल्यावरच कारवाई होणार आहे का? ठेकेदाराला मोकळे रान देणारे अधिकारी कोण, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

संगमेश्वर महामार्गावर दररोज मृत्यूला आमंत्रण दिले जात असताना प्रशासनाची शांतता संशयास्पद आहे. जर तात्काळ ठेकेदारावर कठोर कारवाई, धूळ नियंत्रण, पाणी मारणी, सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर उद्भवणाऱ्या प्रत्येक अपघाताची आणि आजाराची जबाबदारी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारावरच येणार, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.