
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल–निढळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या निढळेवाडी गावात नळातून चक्क कुजलेले जलचर प्राण्यांचे अवशेष आणि तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी वाहून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.
शनिवारी (24 जानेवारी 2026) सकाळी नेहमीप्रमाणे नळाला पाणी आले असता भांडी भरताना पाण्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणांतच नळातून कुजलेले, सडलेले जलचर प्राण्यांचे अवशेष बाहेर पडू लागल्याने नागरिक अक्षरशः हादरले. हे दृश्य पाहून पाणी पिणे तर दूरच, नळ उघडण्याचीही भीती निर्माण झाली आहे. हे अवशेष अनेक दिवस पाइपलाईनमध्ये किंवा जलस्त्रोतामध्ये साचून राहिले असावेत, अशी गंभीर शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या धक्कादायक प्रकाराचे फोटो व व्हिडीओ ग्रामस्थांनी टिपले असून त्यामध्ये नळातून बाहेर पडणारे कुजलेले अवशेष, घाणेरडे पाणी आणि नागरिकांची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक घरांमध्ये आधी साठवलेले पाणी सुरक्षित आहे की नाही, याबाबत प्रचंड संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार ओझरखोल, निढळेवाडी आणि कुरधुंडा ही तीनही गावे एकाच जलस्त्रोतावर आधारित असून ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. सध्याचा प्रकार निढळेवाडी गावापुरताच मर्यादित असल्याचे सांगितले जात असले, तरी एकाच स्त्रोतावरून पाणीपुरवठा होत असल्याने इतर गावांनाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या दूषित पाण्याचा वापर झाल्यास पोटाचे गंभीर विकार, संसर्गजन्य आजार, विषबाधा तसेच जीवघेणी आरोग्यहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून “नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य आहे की मृत्यूला आमंत्रण?” असा संतप्त सवाल आता प्रत्येक घरातून विचारला जात आहे.
या प्रकरणामुळे जलस्त्रोताची स्वच्छता, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, पाइपलाईनची तपासणी व देखभाल, तसेच संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवरील नियंत्रण याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निढळेवाडीत नळातून घाण, दुर्गंधी आणि मृत अवशेष बाहेर येत असल्याचे चित्र संतापजनक आहे. हा प्रकार प्रशासनाला खडबडून जागे करणार का, की नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा गंभीर प्रश्न नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहणार? निढळेवाडीतील या भयावह घटनेमुळे संपूर्ण ओझरखोल–निढळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत परिसरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.



























































