
गोवा बनावटीच्या दारूची जिल्ह्यात होणारी विक्री रोखण्यात उत्पादन शुल्क विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. यामुळे रत्नागिरी पोलिसांनीच दारुविक्रीविरोधात कंबर कसली आहे. राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा चेक पोस्ट येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे 95 बॉक्स जप्त केले. जप्त केलेल्या दारुची किंमत 63 हजार 650 रुपये आहे. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
मागील काही महिने राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत होते. यावेळी तेथे टाटा कंपनीची टाटा इंट्रा गाडी आली. उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांच्या पथकाने ही गाडी थांबविली आणि तपासणी केली. तपासणीत आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण 95 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारू आणि चालकासह सदर वाहन देखील ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65(अ)(इ)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.