Ratnagiri News – शृंगारपूर येथे कोंबडीवर झडप मारली आणि बिबट्या घरात शिरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे बिबट्या एका घरात शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. घरातील पिंजऱ्यात असलेल्या कोंबडीवर झडप मारण्याच्या हेतून बिबट्या घरात शिरला होता. आरडाओरडा केल्याने काही वेळ बिबट्या घरातच लपून बसला होता. बऱ्याच वेळाने बिबट्याला जेरबंंद करण्यात वनविभागाला यश आले.
शुक्रवारी (19 डिसेंबर 2025) रात्री शृंगारपूर येथील ग्रामस्थ सदाभाऊ यांच्या घराच्या शेजारी असलेल्या रड्यात बिबट्याने एका कोंबडीवर झडप घालून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. घरातील सदस्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या काही काळ घरताच दबा धरून लपून बसला होता. मात्र, काही वेळाने तो पुन्हा बाहेर आला परिसरात वावरू लागला. गावकऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळताच सर्वजण एकत्र आले. सरपंच विनोद पवार यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.
वनविभागानेही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून मोहीम सुरू केली. राजा म्हस्के यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या कामात सहकार्य केले. अखेर पावणे नऊच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.