
दापोली तालुक्यातील शिरसोली शिवारात लागलेल्या वणव्यात अनेक झाडे जळून खाक झाली. वणव्याच्या भडक्यात आंबा, काजूच्या झाडांसह वनसंपदा जळून खाक झाली. वणव्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रानात वाळलेल्या गवतामुळे वणवा भडकला. यात आंबा काजू लागवड जळाली असून कोकणी रानमेव्याची रानटी रोपं झाडं-झुडप वणव्याच्या आगीत पार होरपळून गेली.
सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रानातील गवत पूर्णपणे सुकलेले आहे. शेतकऱ्याने भाजावळीसाठी आपल्या शिवारातील गवत राखून ठेवले होते. या राखून ठेवलेल्या सुक्या गवताने पेट घेतल्याने सपाट पठारावर स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आंबा काजूच्या रोपांना आगीची झळ बसली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली रोप आणि रोपाला संरक्षण म्हणून उभारलेल्या जाळ्यांनीही पेट घेतला.



























































