
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यात जागोजागी पडलेली भलीमोठी ‘विवरं’ पाहून वाहनचालकांचा थरकाप उडत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आवाज उठवून रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी, अशी मागणी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांनी स्वता: शहरात फिरून पाहणी केली.
शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पुराव्यानिशी अतिशय दुरवस्थेत भयानक पडलेल्या खड्ड्यांबाबतची परिस्थीती नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. आरएमसीने हे खड्डे बुजवावे अशी मागणी केली. ही मागणी मान्य करत नगरपरिषदेने काल मध्यरात्रीपासून खड्डे भरण्यास सुरूवात केली. “मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. जागेवर गेल्याशिवाय समस्या समजत नाही व ती सोडवता येत नाही.” असे सांगून प्रशासनाला प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करण्याचे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी जिल्हा महिला उपाध्यक्ष शमीम नाईक, शहर कार्याध्यक्ष मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला, अल्पसंख्याक शहराध्यक्ष फर्जना मस्तान, आलिया मजगावकर यांनी पुरावे दाखवत शहरामध्ये भटक्या कुत्र्यांपासून शहरातील नागरिक व लहान मुलांवरती जीव घेणे हल्ले होत असल्याच दाखवून दिलं. या भटक्या कुत्र्यांचं लवकरात लवकर नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, माजी नगरसेवक सईद पावसकर, फरहान मुल्ला, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष महबूब मोगल, माजी नगरसेवक बबन आंबेकर, जिल्हा युवक सरचिटणीस मतीन बावानी रणजीत शिर्के, जिल्हा युवक उपाध्यक्ष नदीम मुजावर, युवकचे फैद सावकार, जुबेर करंबेळकर, कय्युम काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.