
दापोली पालवणी मार्गे मंडणगड मार्ग हा दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना जोडणारा वाहतुकिच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ते खचून रस्त्यावर भगदाडे देखील पडली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.
दापोली तालुक्यातील कुडावळे, कादिवली, वेळवी, साकुर्डे, पिचडोली, रेवली, कलानगर, धानकोली, कांगवई, आवाशी आदी अनेक गावातील रहिवाशांना पालवणी मार्गे मंडणगड मुंबईकडे जाण्यासाठी जवळचा असा हा मार्ग आहे. या मार्गावर मंडणगड हद्दीत खड्डेच खड्डे पडले आहेत, तसेच रस्त्यावर पडलेल्या भगदाडांमुळे हा रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नाही. या मार्गावर सतत एसटी बसेस धावत असतात. तसेच खाजगी वाहनांचीही या मार्गावर कायमच वर्दळ सुरू असते. त्यातच आंजर्ले हर्णैकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचीही या मार्गावर वर्दळ असते.
वाहनचालकांना या धोकादायक रस्त्याचा वापर करून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत असून ना खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतंय ना रस्त्यावर पडलेली भगदाडे बुजवून रस्ता वाहतूक योग्य करत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.
दापोली पालवणी मार्ग वाहतुकयोग्य करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, गणेशोत्सवापूर्वी दापोली पालवणी मार्गे मंडणगड रस्त्त्यातील खड्डे बुजवून टाकावेत, तसेच रस्त्यावर पडलेली भगदाडे बुजवून रस्ता सुस्थितीत करावा, मंडणगड सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे आणि भगदाडे बुजवून टाकली नाहीत. तर ऐन गणेशोत्सवात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तीव्र आंदोलन करेल. या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याला मंडणगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा शिवसेना दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी मंडणगड सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.