Ratnagiri News – शिक्षण वाचवा शाळा वाचवा! शाळा बंद ठेवत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिक्षण वाचवा शाळा वाचवा अशा घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संचमान्यतेसंदर्भात प्रसिद्ध केलेला 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर एक दिवस शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले.

रत्नागिरी शहरातील माळनाका येथून शिक्षकांचा मोर्चा सुरू झाला. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. माळनाका येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. कार्यालयाबाहेर घोषणा दिल्यानंतर शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अय्युब मुल्ला, समन्वय समितीचे सचिव व अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, रमेश तरवडेकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत, सचिव महेश पाटकर, मंगेश गोरिवले, नरेंद्र करमरकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते, सचिव रोहित जाधव, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संजय पाथरे, सचिव निलेश कुंभार, उर्दू संघटनेचे अध्यक्ष शौकत महाते, शिक्षक परिषदेचे सचिव पांडुरंग पाचकुडे, ग्रंथपाल संघटनेचे विवेक महाडिक , शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहूल सप्रे उपस्थित होते.

15 मार्च 2024 चा संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर येणारा आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळा नामशेष होणार आहेत. जिल्ह्यातील इयत्ता नववी आणि दहावीचे 101 वर्ग शून्य शिक्षकी होत आहेत, तर जवळपास 76 शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत, अशी खंत व्यक्त करताना ग्रामीण भागातील शाळा बंद केल्या तर विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागेल. शिक्षण हे विद्यार्थ्यांना गावातच उपलब्ध करून दिले पाहिजे असे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.