
रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ग्रामीण भागातील ही जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही संवाद दौरा सुरू केला आहे. संवाद दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करणार आहोतच त्याशिवाय जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. पुढचे काही दिवस अहोरात्र मेहनत करून रत्नागिरी जिल्ह्यात मशाल पेटवू, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी व्यक्त केला. ते चिपळूण तालुक्यातील संवाद दौऱ्यात बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यात संवाद दौरा सुरू केला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम संवाद साधत आहेत. चिपळूण तालुक्यात कळवंडे, खेर्डी, सावर्डे, कुटरे, कोकरे, अल्लोरे, शिरगाव आणि पेढे या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात संवाद दौरा संपन्न झाला.
यावेळी चिपळूणचे संपर्कप्रमुख सुरेश कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, क्षेत्र प्रमुख बाळा कदम, अशोक नलावडे, शहरप्रमुख भैय्या कदम, सुधीर शिंदे, उपजिल्हा महिला संघटक धनश्री शिंदे, रूमा देवळेकर, मानसी भोसले, युवासेना तालुका युवाधिकारी उमेश खताते,पार्थ जागुष्टे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या कार्यक्षमतेवर विश्वास- दत्ताजी कदम
संवाद दौऱ्यात जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की,स्वार्थासाठी काही मंडळी पक्ष सोडून गेली असली तरी त्यांची चिंता करू नका. सर्वसामान्य जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत आहे. आपली संघटनात्मक बांधणी तळागाळात असून शिवसैनिकांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला गतवैभव परत मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीची मोर्चेबांधणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संवाद दौरा सुरू करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या संवाद दौऱ्यामुळे शिवसेनेचा झंझावात सुरू झाला आहे. चिपळूण पाठोपाठ संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात संवाद दौरा होणार आहे.



























































