
झोपेत असलेल्या महावितरणला जागे करण्यासाठी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मार्गताम्हाणे येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वाढीव वीजबील, नवीन स्मार्ट मीटर बसवणे, अंदाजे बील पाठवून महावितरणकडून होत असलेल्या चुकीच्या वीजबील वसुलीविरोधात रामपूर जिल्हा परिषद गट आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोर्चा काढला. भगवे झेंडे घेऊन शेकडो ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयावर धडकले.
वीज ग्राहकांच्या बीलात अचानक वाढ झाली आहे. ही वीजबीले पुन्हा तपासून सुधारित बीले द्यावीत. स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत. मीटर वाचन न करता अंदाजे वीजबीले काढली जातात त्याऐवजी वीज मीटरचे नियमित वाचन करून बीले काढावीत. खासगी कंपन्यांची नियुक्ती थांबवावी. सर्व कामे महावितरणच्या माध्यमातून पारदर्शक व्हावीत. चुकीच्या कामांना जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.