
पानगळ सुरु झाली की, शिशिर आल्याची आपोआप जाणीव होते. त्यानंतर येणाऱ्या वसंताचा हंगाम म्हणजे निसर्गाच्या आनंदाला आणि बहराला येणारे उधाण! निसर्ग आनंदला म्हणजे भन्नाट बहरतो. सारा परिसर विविधरंगी फुलांसह, फळांनी लगडलेला पहायला मिळतो. निसर्गाच्या या खजिन्यात फुले दृष्टीला मंत्रमुग्ध करतात तर, फळे रसनेला सुखावून टाकतात. निसर्गातील हा रानमेवा चाखण्यासाठी त्याच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. फुले-फळे दृष्टीला दिसून तरी येतात मात्र न दिसणारा गंध आपल्याला अलगद ओढत नेतो. याच हंगामात येणारी करमलाची फळं पिकल्यानंतर मस्त आंबटगोड लागतात. कोकणात या फळांचं लोणचं घातलं जातं.
राजेमहाराजांच्या संग्रहात असणाऱ्या पुरातन अत्तराच्या कुपीतील गंधालाही दुर्लक्षित करेल असा गंध या वसंत ऋतू मधील आसमंतात पसरलेला असतो . वसंत सर्वांनाच मोहित करतो आणि प्रेमातही पाडतो . शिशिराच्या अखेरी पूर्वीच वसंत आपली शोभा पसरवायला सुरुवात करतो . निसर्ग आपल्याला काय काय देतो , हे सजग नेत्रांनी पाहिले तर, वसंतात सारं काही दिसून येतं . करमलं पिकली की , ग्रामीण भागात तो आजही रानमेवा म्हणून चाखला जातो. या करमलांचा अन्य काहीच उपयोग नसला तरी , यांच लोणचं घातलं जातं .
सुरुवातीला हिरवे असणारे हे फळ पिकल्यानंतर पिवळसर होते . याची चव अवीट आंबटगोड अशी असल्याने मुलांना ते अधिक आवडते . चार बाजू पुढे आलेल्या या फळाचा आकार देखील तसा आकर्षकच असतो . करमलं पिकू लागल्यानंतर ग्रामीण भागात मुलांचा घोळका या झाडाखाली गोळा होतो . केळीच्या पानावर मीठ आणि तिखट घेऊन या झाडाखाली बसत, करमलं कापून त्याला तिखट मीठ लावून याचा आस्वाद आजही घेतला जातो.
शिशिराची पानगळ सुरु होवून वाऱ्याच्या मंद लाटा सुरु झाल्यानंतर वसंताची चाहूल लागते . आम्रसखा कोकीळ मोहोराच्या गंधात आपल्या सुरांची मैफील सजवत असतो. सारं वातावरण हृदयात आणि मनात साठवून ठेवावे असेच असते . कोकणच्या रानमेव्यात सध्या करमलांची लज्जत चाखली जातेय.






























































