Ratnagiri News – दापोलीत शिक्षकी पेशाला काळीमा, अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करणारा शिक्षक अटकेत

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दापोली तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नराधम शिक्षकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. किशोर काशीराम येलवे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळ परिसरातील एक 10 वर्षीय विद्यार्थिनी सोमवारी दुपारी 4.30 च्या सुमारास घरी जात होती. यावेळी किशोर काशीराम येलवे या शिक्षकाने त्याच्या दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. घरी सोडतो असे सांगत मुलीला दुचाकीवर बसवले.

घरी आल्यावर ती विद्यार्थिनी घरात गेल्यावर कपडे बदलण्यासाठी घरातील खोलीत गेली असता हा शिक्षकही तिच्यामागे गेला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेवून या शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या मुलीने त्यास विरोध करत त्याला ढकलून देत शिक्षकाला निघून जाण्यास सांगितले. घरून जाताना शिक्षकाने याबाबत कुठेही वाच्छता न करण्यासाठी मुलीला धमकावले.

मुलीने घडलेली ही घटना शेजारी सांगितल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या पालकांना बोलावले. पालकांना याबाबत कळताच त्यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात येऊन शिक्षक किशोर काशीराम येलवे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार किशोर येलवे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 332 (सी), 351(2) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 8, 10 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.