
कारीवणी नदीवरील पुलाचा स्लॅब उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. पुलावरील उखडलेल्या स्लॅबमधून लोखंडी शिगा बाहेर आल्याने या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.
दापोली तालुक्यातील शिवाजीनगर महसूली गावाच्या हद्दीतून कारीवणी नदी वाहते. या नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरील स्लॅब उखडून त्यातून लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. स्लॅब उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये पावसाचे गढूळ पाणी तुंबत असल्याने बाहेर आलेल्या शिगा पायी चालणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहन चालकांना खड्ड्यांमध्ये साचलेल्या गढूळ पाण्यामुळे दिसून येत नाहीत. त्यामुळे या पुलावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.
दापोली साखळोली मार्गे गावतळेकडे जाणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर असलेल्या कारीवणी नदीच्या पुलावर उखडलेल्या स्लॅबच्या डागडुजीकरीता सिमेंट कॉक्रीट ओतून उखडलेला स्लॅब बुजवून पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.