
गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर तसेच संचालक नेहा नार्वेकर या दांम्पत्याला शनिवारी रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गुंतवणूकदाराना समजताच त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरघोस परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या टीडब्ल्यूजेमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी लाखोच्या पटीत रकमा गुंतवल्या आहेत, बक्कळ रक्कम जमवल्यानंतर काही महिन्यांनी कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर आणि संचालक नेहा समीर नार्वेकर या दांम्पत्याने गुंतवणूकदाराना आर्थिक गंडा घातला.
गुंतवलेल्या रकमेवर दर महिन्याला ३ ते ४ टक्के परतावा देण्याचे आमिष ठेकेदार प्रतीक माटे यांना देत त्यांचे ३ लाख ५० हजार रुपये, तसेच त्यांच्या बहिणीचे २५ लाख रुपये अशी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांनी केली. याप्रकरणी नार्वेकर दांम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर चिपळूण पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सर्व प्रकार उघडकीस येताच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन याप्रकरणी चिपळूणसह रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
गुंतवणूकदाराची संख्या व गुंतवणुकीची रक्कम लक्षात घेता फसवणुकीची व्याप्ती कराडोपर्यंत पोहोचली आहे. याबाबतचा तपास रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वीच फसवणूक प्रकरणी संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी समीर नार्वेकर तसेच नेहा नार्वेकरवर गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी त्यांना ठाणे येथे अटक करण्यात आली होती. शनिवारी नार्वेकर दांम्पत्याला रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. टीडब्ल्यूजे कंपनीचे शहरातील बायपास मार्गावर आलिशान कार्यालय होते. त्यात मोठा कर्मचारी वर्गदेखील कार्यरत होता. मात्र फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद झाले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार नार्वेकर दांम्पत्यावर गुन्हा दाखल होताच रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.


























































