रत्नागिरीत शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना, शहरात संताप आणि तणाव

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना घडल्यामुळे भ्रष्टाचारी आणि बेजबाबदार निष्क्रिय सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडपह्ड करून विटंबना केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरीत मारुती मंदिर येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याचे एका व्यक्तीने नुकसान केले असल्याची माहिती मिळाल्यावरून पेट्रोलिंग अंमलदार यांनी एका व्यक्तीला हटकले. तेव्हा ती व्यक्ती मारुती मंदिर येथून एसटी स्टॅण्डच्या दिशेने पळून गेली. त्या घटनेचे गांभिर्य ओळखून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने आठवडाबाजार येथून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेतील आरोपीचे नाव संदेश गावडे (24) असे आहे. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा आरोपी रत्नागिरी शहरातील रहिवासी असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवांचे बळी होऊ नये.

शिवसैनिकांनी केली पाहणी

शिवसृष्टी येथील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडपह्ड झाल्याची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी जाऊन घडलेल्या प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱयांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱयांची भेट घेतली. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना रत्नागिरी शहरात घडू नयेत. युगपुरुषांच्या पुतळ्यांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी सीसीटीव्ही चालू स्थितीत असावेत, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, बावा चव्हाण, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला शहर संघटक मनीषा बामणे, माजी नगरसेवक सलील डाफळे, राजश्री शिवलकर, विजया घुडे, सेजल बोराटे, राजश्री लोटणकर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांची तडकाफडकी बदली

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे राज्यातील महायुती सरकार अडचणीत आलेले आहे. आता या घटनेनंतर राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना बळीचा बकरा केले असून किशोर तावडे यांची सरकारने आज तडकाफडकी बदली केली आहे.